परंतु कधीकाळच्या शिवयुगात अशा विकृतीची सूक्ष्मतम लक्षणे मानवी स्वभावातच आहेत, हे ओळखणारे आचार्य भारतीयांच्यात होते. त्यांच्यापाशी मार्गदर्शक ठरू शकणाऱ्या 'शिव' प्रतीकात्मकतेला रूप देण्याचे सामर्थ्य होते. सकारात्मकतेचा सर्वव्यापी अर्थ नमूद करणारे शिवप्रतीक त्यांनी निर्माण केले. नवज्ञाननिर्मितीचा मार्ग क्रांती-बंडखोरीतून नाही, तर सकारात्मक, रचनात्मक स्मरण, मनन, चिंतनातील सर्जनशील कोषभेदामुळे शक्य होतो,' हे सांगण्यासाठी!
भारतीय सर्जनशील पुरुषार्थाचा वारसा आणि इतिहासच शिवमूर्तीत एकरूप झाला होता. त्यातील सकारात्मक उद्दिष्टांना शिरोधारी ठेवत भारतीयांचा नवा विकासप्रवास सुरू झाला. शिव प्रतीकात्मकतेच्या प्रत्येक पैलूवर होणाऱ्या नव्या चिंतनासाठी हिमालयातील चिंतनस्थाने महत्त्वाची ठरू लागली. त्या स्थानांनी मानवी सर्जनशील पराकाष्ठांच्या उंचीचे महत्त्व भारतीयांना पटवले. ती उंची गाठण्याच्या अभिरुचीला आणि क्षमतेला त्यांनी 'पार्वती' मानले. या पार्वतीमान्यतेमुळे 'प्रत्येक नव्या सर्जनशील चिंतनासाठी नव्या स्थानबिंदूंचा शोध' गरजेचा ठरला. पार्वती म्हणजे आदिशक्तीला, तिच्या शिवरूपाला अधिक परिपूर्ण करणारी ऊर्जा ठरू लागली.
'शिव-पार्वती' संकल्पनांच्या प्रभावात भारतीय लोक आता विविध दिशांनी प्रगत ठरू लागले. वाढत्या लोकसंख्येचा मानवी संवेदनशीलतेच्या संदर्भात नव्याने अभ्यास घडू लागला. समाजात सकारात्मक, नकारात्मक आणि त्यांच्या मध्यावर असलेल्यांच्या संवेदनशीलता आचार्यांच्या लक्षात आल्या. त्या तीन संवेदनशीलता बाळगणाऱ्यांचे संख्याबळ लक्षात आले. सज्जन कमी असतात. नकारात्मक सर्प-बैल प्रवृत्ती बाळगणारे तुलनेत अधिक असतात आणि दोघांच्या मधला समाज विराट असतो, हे आचार्यांच्या ध्यानी आले. हा विराट समाज सज्जनांच्या परिघात ठेवण्यासाठी 'शिव-पार्वती' संकल्पनांचा एकत्रित विचार समाजतारक ठरेल, असा विश्वास त्यांना वाटला. त्यांनी शिव-पार्वतीभक्ती म्हणजे आदिशक्तीची भक्ती आणि आदिशक्तीची भक्ती म्हणजे दृश्य-श्राव्यसौंदर्य-चैतन्यभक्ती असा विचार मांडला. अशा सौंदर्य-चैतन्यभक्तीने व्यापलेला परिघ म्हणजे व्यापक जनकल्याणाचा परिघ. दुर्जनांना दूर ठेवणारा सज्जनशक्तीचा परिघ, गणतंत्राचा परिघ, हे आचार्यांचे संशोधन ठरले. 'दृश्य-श्राव्यसौंदर्य-चैतन्य भक्तिमान्य आचरण ठेवा, गणतंत्राच्या परिघातले अनुशासन जवळ करा आणि 'गण' बना!' हा आचार्यांचा संदेश होता. आचार्यप्रधान व्यवस्थेत हा संदेश लोकांनी 'आचार्य आदेश' म्हणून शिरोधारी ठेवला! दुर्दैवाने काळाच्या ओघात हे सारे लुप्त झाले. क्रांती-बंडखोरीच्या पर्वात ते पुन्हा लाभावे कसे?
- रवी परांजपे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट