Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 30

परीघ राष्ट्रधर्माचा!

$
0
0

गण, गणतंत्र, गणपती या गणेशयुगीन संज्ञा. इसवीसनपूर्व सात हजार ते इसवीसनपूर्व तीन हजार या काळातल्या! हनुमान आणि शिवयुगातील सर्व लाभदायक फलितांना परिपक्व बनवणारा तो काळ! त्या काळात भारताला दृश्य-श्राव्य सौंदर्यभक्तीच्या परिघाचे महत्त्व नव्याने पटले. हा परीघ एका बाजूने नवनिर्माण चैतन्य, तर दुसऱ्या बाजूने धर्म आणि राष्ट्रधर्म फुलवतो असे भारतीयांना समजून चुकले. हे दोन्ही फुलोरे एकामेकांना पूरक असतात, सज्जनशक्तीचा आवाज बुलंद करतात, असेही सिद्ध झाले. संस्थापकरहित, ग्रंथरहित अशा या गणेशयुगकालीन अमूर्त धर्माला 'सनातन मानवधर्म' मानले गेले.

मानवी जीवनात जितके स्तर असतात, निर्माण होतात, त्या स्तरांवरील विवेकी सदाचारण हे त्या अमूर्त धर्माचे महत्त्वाचे लक्षण. मानवाच्या सर्व कल्याणकारी सर्वोच्च क्षमतांना ईश्वर मानवाच्या आत्मिक अवकाशाला जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा मानणे, ही सनातन मानवधर्माची खासियत. निर्मळात्मा परेश ही परमात्म्यापलीकडील उपाधीवेगळ्या अवकाशाची ओळख. मानवी आत्म्यात वसणाऱ्या निर्गुण निराकार परमेश्वराची ओळख! या स्व-आत्म्याच्या जागृतीसाठी मानवाने कलावंत बनावे वा रसिक. गणपती बनावे वा गण. अशी अपेक्षा या धर्मात होती. साहजिकच समाजातील रसिक गण सर्जनशील कलावंत शास्त्रज्ञांना 'राव' म्हणत. असे 'राव' रसिक गणांना आणि समाजाला 'मायबाप' मानत. विषमता घालवण्याची ही गणेशयुगीन रीत महत्त्वाची होती...

प्रत्येक कला, शास्त्राबाबत एक ना एक निर्मिती अवकाश असतो. तो शोधावा लागतो. नवनिर्मितीचे सूत्र शोधावे लागते. अवकाश सूत्राचे सुंदरसे एकरूपीकरण करावे लागते. याचे भान गणेशयुगाने दिले. अवकाशाच्या संतुलित मांडणीचा विचार म्हणजे लावण्यनीती. अशी लावण्यनीती कलेतील औचित्य आणि सौंदर्याच्या मेळाची द्योतक असते. या मेळास भारतीय पूर्वसूरी आचार्यांनी लालित्य मानले. 'लावण्यनीती, लालित्य, डिझाइन ही दाखवण्याची गोष्ट नव्हे. परंतु जे दाखवायचे वा सादर करायचे, त्यामागे लालित्य वा डिझाइन हवे!' या अर्थाचे इंग्रजी विधान सध्या दूरचित्रवाणी जाहिरातीत ऐकू येते. ते इथे महत्त्वाचे! लालित्यविषयक धारणा बाळगणाऱ्या लोकांचा परीघ हा सौंदर्य चैतन्यभक्तीचा परीघ असतो. तोच विवेक, तारतम्य, धर्माचा परीघ बनतो. त्यात स्वतःसोबत इतरांच्या सुखाचा विचार वाढतो. म्हणूनच असा परीघ सुरचना, सुव्यवस्था आणि सुयंत्रणांच्या बांधिलकीचा, राष्ट्रधर्माचा परीघ ठरतो. असा राष्ट्रधर्म सर्जनशील राष्ट्रीय पुरुषार्थाची, सज्जनशक्तीच्या श्रेष्ठतेची आणि सर्वांना समान विकाससंधी लाभण्याची ग्वाही देतो... काय, एकविसाव्या शतकातील भारताला या ग्वाहीतला गौरव पुन्हा प्राप्त व्हावयास नको?
- रवी परांजपे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 30

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>