भारतीयांनी ओळखले की, 'रेषा एकटी फारसे साध्य करू शकत नाही! तिला एका सखीची जोड दिल्यानेच आकार लाभण्याच्या शक्यता वाढतात'. हेन्री मातीस नामक फ्रेंच चित्रकाराच्या या विधानाचा अर्थ भारतीयांनी कैक वर्षे आधी अनुभवला, असे काहीसे झाले. एका रेषेशी कोन साधत त्यांनी दुसरी जोडली. दुसऱ्या रेषेवर तोच कोन साधत पहिल्या रेषेला जोडणारी तिसरी काढली. इथे, भारतीयांनी एक कोषभेद साध्य केला. त्या मार्गेच त्रिकोन-चौकोनापासून वर्तुळापर्यंतचे आकार त्यांना वश झाले. भारतीयांना भौमितिक अवकाश गवसला.
या दृश्यकलात्मक-तांत्रिक-बौद्धिक विकास मार्गावरची भारतीय प्रगती चित्रकलेच्या दिशेने पुढे सरकली. चिखलात बरबटलेल्या पावलांच्या ठशांनी रंगनिर्मितीची प्रेरणा दिली. डिंकासारखे द्रवरूप होणारे पदार्थ शोधले गेले, रंग तयार झाला. पुढे त्यांनी ओबड-धोबडसा 'घट'ही निर्माण केला. घटाच्या निर्मितीने द्विमितीय अवकाशाच्या जोडीला त्रिमितीय-चौमितीय अवकाशाचे भानही भारतीयांना आले. जंगली अवस्थेपासून परिपूर्ण अवकाश भानापर्यंतचा प्रवास शक्य करणाऱ्या स्वतःच्या 'आदिशक्ती'ची महती भारतीयांना पटली. या आदिशक्तीच्या चिंतन-मनन-स्मरणातून साकारलेला पहिला मोठा प्रकल्प भीमबेटका गुंफाचित्रांच्या स्वरूपात घडला.
भीमबेटका गुंफाचित्रांची एक शाखा आजच्या 'वारली' चित्रशैलीच्या दिशेने विकसित झाली. या विकासातही रेषा-त्रिकोण व वर्तुळ या पूर्वज्ञात संकल्पनांचा 'कोषभेद' घडला. त्रिकोणांचे शिरोबिंदू एकत्र आणून तयार होणाऱ्या आकृतिबंधाचा मानवाकृती-प्राणी चितारण्यासाठी उपयोग करण्यात आला. त्याला द्विमितीय रचनात्मकतेचे कोंदण पुरवण्यात आले. रेषा-त्रिकोण व वर्तुळादि सामान्य-लौकिक गोष्टी अलौकिक दर्जावर पोहोचवण्याची क्षमता भारतीयांना लाभली.
आदिशक्तीचे प्रतीक ठरलेला 'घट' आता पूजनीय बनला. ही सारी वाटचाल, नंतर प्रतिवर्षी येणाऱ्या नवरात्र-दसऱ्याची नांदी नव्हती? आज, त्या सणा-वारांचे स्वरूप सर्जनशील पुरुषार्थापासून दूर हटताना तरी आम्ही आमची 'खरी आदिशक्ती' ओळखायला हवी! तेव्हा, आदिशक्ती म्हणजे जे ज्ञात आहे, त्यातून कल्याणकारी, नवे व उच्चप्रतीचे निर्माण करण्याची मानवी शक्ती. नवे सकारात्मक जोडकाम करण्याची शक्ती. परस्पर विरुद्ध गुणधर्माच्या पदार्थ-विचारांचे मीलन घडवण्याची शक्ती. गुंफण-रचना करण्याची शक्ती. अवकाशाला नवा आकार मिळवून देण्याची शक्ती. आदिशक्ती म्हणजे मानवी जीवन अधिकाधिक सुंदर-संपन्न-सुरक्षित करण्याची मानवी शक्ती.
- रवी परांजपे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट